लोकसभेत बारामतीची जागा लढणारच, अजित पवारांचं खुलं आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

0
86

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील संघर्ष टीपेला पोहोचलेला असतानाच आज कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात अजित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.

तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या चारही जागा आमचा गट लढवणार असल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं आहे.

अजित पवार यांची ही घोषणा बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेलं आव्हान समजलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिक आहे. लोकशाहीत एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे, हा त्यांचा अधिकार आहे,” असं सु्प्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

कुटुंबातील एक व्यक्ती बारामतीसारख्या जागेवर जिथं तुम्ही खासदार आहात, तिथं आमचा पक्षही निवडणूक लढवणार आहे, असं म्हणतो त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला.

त्यावर खासदार सुळे म्हणाल्या की, “आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगळं आहे. या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते. लोकशाहीत कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच.

त्यामध्ये गैर काय? कोणीतरी लढलंच पाहिजे, असा माझा आग्रह राहणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे. कोण योग्य आहे, हे बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता ठरवेन.”

‘देवगिरीवरील बैठकीत मला बोलावलं नव्हतं’

राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजप-शिवसेनेसोबत राज्य सरकारमध्ये सामील होण्याआधी अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांची एक बैठक झाली होती

. या बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांनी मला निर्णय घेण्यासाठी सात दिवसांचा वेळ हवा आहे, असं सांगितल्याचा दावा अजित पवार यांनी आजच्या भाषणात केला. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “मला त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, म्हणून मी तिथून बाहेर पडली होती. मात्र त्यांचा जो प्रस्ताव होता त्यावर निर्णय घेण्याबाबत बाबांसोबत चर्चा करण्यासाठी मला सात दिवस द्या, असं मी त्यांना सांगितलं होतं,” अशी माहिती सुळे यांनी दिली आहे.

अजित पवार यांचं लोकसभेसाठी रणशिंग

अजित पवार यांनी आपल्या गटाच्या आजच्या शिबिरातून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. “लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.

बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार मतदारसंघात आपण निवडणूक लढवणारच आहोत. पण त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथं खासदार आहेत, त्यातील काही जागा आपल्याला मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here