तारुण्यात योग्य दिशा मिळाल्यास एच.आय. व्ही. पासून दूर -सिने अभिनेते अवधूत जोशी

0
110

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : तारुण्यात अनेक प्रकारच्या आकर्षणामुळे विपरीत पाऊल पडण्याची शक्यता असते. याच वयात प्रत्येकाने खबरदारी घेतल्यास एचआयव्ही पासून दूर रहाल, असे प्रतिपादन सिने अभिनेते अवधूत जोशी यांनी केले.


जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या प्रभात फेरी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ. माधव ठाकूर, अंजली देवरकर हे प्रमुख उपस्थित होते.


अवधूत जोशी म्हणाले, काही वर्षांपूर्वी एचआयव्ही एड्स म्हटलं की भयानकता जाणवायची. या आजाराबद्दल भरपूर गैरसमज होते. माहिती, शिक्षण, संवाद आणि एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे सध्या ही परिस्थिती बदललेली आहे. युवकांनी तारुण्यात खबरदारी घ्यावी व सामाजिक बांधिलकी म्हणून एड्स जनजागृतीचे कार्य करावे.


प्रास्ताविकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर म्हणाल्या, “आता पुढाकार समुदायाचा” ही यावर्षीची थीम असून आत्तापर्यंत एड्स नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यामुळे नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात आली आहे. आता यापुढे समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे. एड्स दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये एचआयव्ही समुपदेशन व चाचणी मोफत केली जाते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींकरिता दिल्या जाणाऱ्या एआरटी औषधोपचारांमुळे संसर्गित व्यक्तीचे आयुर्मान वाढवण्यास मदत होते. जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाचे काम सर्वांच्या सहकार्यामुळे व सामाजिक बांधिलकी उपक्रमांच्या पाठबळामुळे माहिती, शिक्षण व संवादाचे कार्यक्रम राबविले गेले. यामुळे नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी कमी झाली असून या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व गरज पडल्यास आवश्यक उपचारांसाठी स्वतःहून पुढे यावे. एड्स नियंत्रणामध्ये युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून युवकांनी शास्त्रीय माहिती घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवावी.

एड्स दिनानिमित्त विशेष मुलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी तर शपथ वाचन निरंजन देशपांडे यांनी केले. यावेळी डॉ. ऋतुजा कदम, डॉ. सुभाष जगताप, मकरंद चौधरी, कपिल मुळे, अभिजित रोटे, संजय गायकवाड, दीपक सावंत, संदीप पाटील,पल्लवी देशपांडे, शिल्पा अष्टेकर, मनीषा माने, क्रांतीसिंह चव्हाण, राजेश गोधडे, सतिश पाटील, प्रेमजीत सरदेसाई, रविराज पाटील यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व व एड्स नियंत्रण कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here