
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “आधुनिक भारताच्या निर्मितीतील डॉ. आंबेडकरांचे योगदान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून भोगावती महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख व विचारवंत प्रा. डॉ. विजय काळेबाग यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. काळेबाग म्हणाले,
“डॉ. आंबेडकरांनी जात व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. शेती, उद्योग, जलआयोग, वित्तआयोग, ऊर्जा आयोग यांच्या माध्यमातून देश उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. वंचित घटकांना संधी मिळवून दिली आणि शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीचे साधन बनवले.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन करून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यास हातभार लावावा.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले,
“डॉ. आंबेडकर हे मानवतेचे प्रतीक आहेत. जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. युवकांनी व्यसनमुक्त राहून त्यांच्या विचारांचा जागर करावा.”
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आभार डॉ. एकनाथ आळवेकर, सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
कार्यक्रमास कॉलेजचे अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

