
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना रघुनाथ झेंडे व शिवाजीराव पाटील. सोबत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिन अभिवादन सोहळा
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम अत्यंत भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात “विचार अमर असतात” या संदेशाने सर्वांचे मन भारावून टाकले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना इतिहास विभागाचे प्रा. पी. डी. माने म्हणाले,
“महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मृतीदिन नाही. डॉ. आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या समानता, स्वातंत्र्य आणि कल्याणासाठी होते. त्यामुळे त्यांचे विचार आत्मसात करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले,
“अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी केलेले योगदान अद्वितीय आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या कार्याची पाऊलखूण पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.”
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रघुनाथ झेंडे व शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास सचिव शिवाजीराव पाटील, रघुनाथ झेंडे, डॉ. एस. एस. कुरलीकर, डॉ. उषा पवार, डॉ. संपदा पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

