छळामुळे सूननं संपवल जीवन; तीन दिवसांपासून गुंगारा देणारी सासू पोलिसांच्या ताब्यात

0
100

कडा-सासरच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेल्या २५ वर्षीय विवाहितेचा तीन दिवसांनंतर घराजवळील विहीरीत मृतदेह आढळून आल्यानंतर अंभोरा पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना अटक केली होती.

दरम्यान, तीन दिवसांपासून फरार असलेल्या सासूस पोलिसांनी आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान धामणगाव येथून अटक केली आहे. आशाबाई कल्याण राऊत (४०) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील माहेर असलेल्या कोमलचा धामणगाव येथील श्रीकांत कल्याण राऊत याच्याशी विवाह झाला होता.काही वर्ष संसार सुखाचा चालला असताना कोमलला पती,सासरा,सासू,दीर मानसिक त्रास देऊन तिचा छळ करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने २६ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली होती.२९ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह घरालगत असलेल्या राऊत कुटुंबाच्या मालकीच्या विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली.

दरम्यान, मयत कोमलची आई लक्ष्मी जयराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पती श्रीकांत कल्याण राऊत, सासरा कल्याण विठ्ठल राऊत, सासू आशाबाई कल्याण राऊत, दीर निलेश कल्याण राऊत यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पतीसह सासरा आणि दीर यांना राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तर सासू फरार होती.

अखेर आज सकाळी सासू आशाबाईस पोलिसांनी धामणगाव येथून ताब्यात घेतले.ही कामगिरी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे पोलिस नाईक सुवर्णा पालवे यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here