कोल्हापूर : ग्वाल्हेर येथे सोमवारी झालेल्या आंतरविद्यापीठ पश्चिम विभागीय लाॅन टेनिस स्पर्धेत प्रथमच शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सुवर्णपदक पटकावून प्रथमच इतिहास रचला. या विजेतेपदामुळे विद्यापीठाचा संघ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स व ऑल इंडिया युनिर्व्हसिटी टेनिस स्पर्धेसाठीही पात्र ठरला.
स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने उपांत्यपूर्व फेरीत ग्वाल्हेरच्या एलएनआयपी विद्यापीठाचा ८-० असा पराभव केला. या संघात प्रथमेश शिंदेने ग्वाल्हेरच्या यशचा ८-४ , तर संदेश कुरळे याने ग्वाल्हेरच्याच डीफ सुभेदचा ८-० असा पराभव केला.
दुहेरीत प्रथमेश-काफील या जोडीने यश-सुभेद या जोडीचा ८-५ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य लढतीत गुजरात विद्यापीठाचा पराभव केला.
संदेश कुरळेने गुजरातच्या सुरजचा ८-१ असा, तर पार्थने गुजरातच्याच लोसर महेंद्रचा ५-८ असा पराभव केला. दुहेरीत प्रथमेश-संदेश या जोडीने सुरज -महेंद्र चा ८-१ असा पराभव केला. अंतिम सामन्यात शिवाजी विद्यापीठ संघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पराभव केला.
शिवाजी विद्यापीठाकडून प्रथमेश शिंदेने निशित रहाणे ५-८ असा पराभव केला.दुसऱ्या सामन्यात संदेश कुरने जय पवारचा ८-६ असा पराभव केला. दुहेरीत प्रथमेश-संदेश या जोडीने निशित-प्रसाद या पुण्याच्या जाेडीटा ७-७(१०-७) असा कडव्या लढतीत पराभव केला.
शिवाजी विद्यापीठ संघातील हे सर्व खेळाडू केडीएलटीएचे खेळाडू आहेत. या विजयी संघाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मनाल देसाई, डाॅ. आकाश बनसोडे (व्यवस्थापक), क्रीडा विभागप्रमुख डाॅ.शरद बनसोडे यांचे मार्गदर्शन, तर विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. दिगंबर शिर्के, प्र कुलगुरु डाॅ.पी.एस.पाटील, कुलसचिव विलास शिंदे यांचे प्रोत्सहान लाभले.