औषधी आण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सेवकाचा अपघातात जागीच मृत्यू

0
76

 नांदेड  भोकरफाटा ते बारड रस्त्यावरील कलदगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. हा अपघात बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास झाला असल्याचा अंदाज असून याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकरनगर येथील लक्ष्मण बळवंतराव सुर्यवंशी हे ( ता. नायेगाव, जिल्हा नांदेड) कै.मोहनरावजी देशमुख हायस्कूल अंजलेगाव येथे सेवक पदावर कार्यरत होते.

बुधवारी औषधी घेण्यासाठी उमरखेड येथे जाण्यासाठी दुचाकीवरुन ते घराबाहेर पडले. प्रवासादरम्यान बुधवारी रात्री बारड – भोकरफाटा या रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यावेळी डोक्याला जबरदस्त मार लागल्याने लक्ष्मण सुर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना हे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच अर्धापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह अर्धापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.

या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, राजेश घुन्नर, मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी भिमराव राठोड, पोउनी कैलास पवार, तुकाराम बोधमवाड, सतिष लहानकर, विजय कदम, संभाजी गोहरकर आदींनी परिश्रम घेतले.

कर्त्याव्यक्तीच्या निधनाने कुटुंब उघड्यावर
दाती ( ता.कळमनुरी जिल्हा हिंगोली ) येथील बाबुराव मारोतराव पतंगे यांची मुलगी सिमा हिच्याशी लक्ष्मण यांचा १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना १३ वर्षाचा देवांश व ११ वर्षाचा दर्शन ही दोन मुले आहेत. सेवक पदावर ते नायगाव येथे कार्यरत होते.त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here