कोल्हापूर : कोल्हापूररेल्वे स्थानकासाठी आलेल्या निधीच्या कामातून त्याचा चेहरामोहरा संपूर्णपणे बदलून जाणार आहे. कामे जरी सुरू झाली असली तरी परीख पूल, पादचारी मार्ग, दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी जनता बझारपर्यंतचा ओव्हर ब्रीज, स्थानकाचे सौंदर्यीकरण, जुन्या हेरिटेज वास्तूचे जतन केले जाणार काय याबाबत कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही.
अमृत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या कामातून विविध कामे होणार आहेत. त्यात सीबीएस स्थानक ते राजारामपुरी पादचारी पूल तसेच ओव्हर ब्रीजचा प्रश्न मार्गी लावणे बाकी आहे. फ्लॅटफॉर्म क्रमांक दोनकडून चारकडे जाण्यासाठी ब्रीज आणि इलेव्हेटर तसेच लिफ्टच्या कामाचाही समावेश आहे.
सध्या जेथे रेल्वे कर्मचाऱ्यांची इमारत आहे, ती पाडून मुख्य प्रवेशद्वार आणि तिकीट बुकिंग खिडकी, प्रतीक्षालय उभारण्यात येत आहे. सध्या जुन्या हेरिटेज वास्तू असलेल्या तिकीट खिडकीच्या दुरुस्तीचाही समावेश यात आहे.
या जागेत कबुतरांच्या विष्ठा आणि जुन्या पद्धतीची कौले आहेत. पावसाळ्यात ही जागा गळत असल्याने त्याचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे.
नियोजित कामांचे ठळक मुद्दे
- स्टेशनचा दर्शनी भाग सुधारणे.
- बुकिंग काउंटर आणि एटीव्हीएमच्या तरतुदीसह नवीन मोठ्या झाकलेल्या पोर्टिकोची तरतूद.
- पोर्टिकोअंतर्गत जुने बुकिंग काउंटर बदलून नव्या बुकिंग ऑफिसचे प्रवेश लॉबीमध्ये रूपांतर
- रूफ प्लाझासह १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजची तरतूद
- दोन्ही प्रवेशाच्या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र बंदिस्त पार्किंग.
- रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास.
- विद्यमान वेटिंग रूम, व्हीआयपी रूम, एंट्रन्स लॉबी इत्यादींचे नूतनीकरण.
- २ एस्केलेटर आणि २ लिफ्टची तरतूद.
- दिव्यांगजन अनुकूल सुविधांची तरतूद.
- पृष्ठभागाच्या सुधारणेसह संपूर्ण कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मची तरतूद.
- नवीन सुधारित टॉयलेट ब्लॉक्स आणि वॉटर बूथची तरतूद.
- नवीन फर्निचरच्या तरतुदीसह प्लॅटफॉर्म आणि प्रतीक्षा क्षेत्रांवर आसन क्षमता वाढवणे.
- विद्यमान इमारतीच्या छतावरील उपचार.
- परिभ्रमण क्षेत्र, प्रतीक्षालय, प्लॅटफॉर्म इत्यादीवर रोषणाई.
- विविध ठिकाणी डस्टबिनची तरतूद.
- लँडस्केपिंग, रस्ता, पादचारी मार्गांसह परिभ्रमण क्षेत्राचा विकास आणि दुसऱ्या प्रवेशावर पार्किंग सुविधा
कोल्हापूरचे रेल्वेस्थानक हेरिटेजमध्ये असले तरी मात्र संरक्षितस्थळांच्या यादीत ते दिसत नाही. याठिकाणी शाहू महाराजांचे उचित स्मारक होणे गरजेचे आहे. –शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती