अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अनोख्या पध्दतीने निषेध; खुर्चीत गाढवाचे चित्र काढून वेधले लक्ष

0
67

कोल्हापूर : सारथी संस्थेतून पीएचडी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या समस्येवर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी ‘पीएच डी करून काय दिवा लावणार’ असे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुधवारी कोल्हापुरात उमटले.

दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे खुर्चीवर शासन आणि गाढवाचे चित्र काढून निषेध नोंदवला. यावेळी मराठा समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पवार यांचे मंगळवारचे वादग्रस्त वक्तव्य शासनाच्या मुर्खपणाचे आहे. म्हणून फलकावर गाढव बसला आहे, असे चित्र काढून त्यांच्या तोंडातून म्हणजे पवार यांनी काढलेले वक्तव्य ‘पीएचडी करून काय दिवे लावणार हे विद्यार्थी’ असे लिहून लक्ष वेधण्यात आले.

यावेळी अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, मराठा योध्दा मनोज जरांगे- पाटील यांनी मोठया कष्टाने उभा केलेले मराठा समाजाचे आंदोलन शासन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच भाजप ईडीचे गुन्हे असलेले अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक यांना मराठा आरक्षण आंदोलन मोडण्याचे काम दिले आहे.

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सारथीतून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला. यावेळी बाबा पार्टे, मंजित माने, राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, रमेश लाड, सुनीच चव्हाण, शाहीर दिलीप सावंत, दिलीप देसाई, सुरेश कुराडे, डॉ. सुरेखा मुळे, अॅड. सतीश नलवडे, महादेव पाटील यांच्यासह माजी नगरसेवक नियाज खान यांच्या नेतृत्वाखाली डोंबारी समाजाचे उत्तम वरूटे, विष्णू लाखे, राम डावाळे, सारथीतून पीएचडी करणारे संभाजी खोत, ऋषीराज भोसले, मयूर भरमल, सौरभ पोवार, स्वप्नील पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here