भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून १३ जणांवर कारवाई करण्यात आली.

0
68

पाचगणी : भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून १३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार नर्तिका आणि सहा डॉक्टरांचा समावेश आहे.

ते सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. यातील नऊ जणांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नृत्य करीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आँचल दलाल यांना मिळाली.

त्यांनी तातडीने साताऱ्यावरून विशेष पथक तिकडे पाठविले. पोलिस पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर पोहोचले. त्यावेळी या रिसॉर्टच्या तळमजल्यात नतर्कींचे नृत्य सुरू होते.

त्यांच्यासमोर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तकींच्या समोर झिंगत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

पोलिसांनी चार नर्तिका, सहा डॉक्टर, एक फार्मासिस्ट आणि रिसॉर्ट चालकासह तेरा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. चार नर्तिकांना नोटीस देवून सोडून देण्यात आले.

विशाल सुरेश शिर्के (वय ३६, व्यवसाय हॉटेल, रा. पसरणी, ता. वाई), उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय ३१, व्यवसाय वेटर, राहणार स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट, कासवंड, ता. महाबळेश्वर, मूळ राहणार पाती तालुका गुड, जिल्हा रिवा, मध्य प्रदेश), डॉ. रणजीत तात्यासाहेब काळे (वय ४२, रा. बाजार पटांगण, दहिवडी, ता. माण, जि. सातारा), डॉ. नीलेश नारायण सन्मुख (वय ३९, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज, ता. मिरज, जि. सांगली), प्रवीण शांताराम सैद (वय ४०, व्यवसाय फार्मासिस्ट, राहणारा आलडीया, माळुंगे पाडळे, ता. मुळशी, जिल्हा पुणे), डॉ. मनोज विलास सावंत (वय ४०, रा. जयवंत नगर, दहिवडी, ता. माण, जि. सातारा), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय ४०, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय ३१, रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा), डॉ.हनुमंत मधुकर खाडे (वय ६५, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) अशा नऊ जणांवर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पाचगणी पोलिस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

आरोग्य क्षेत्रात खळबळ

या कारवाईत सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी, कराड, मिरज, सातारा व पुणे येथील हे डॉक्टर आहेत. यामुळे या हाय प्रोफाइल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू आहे.

महिला प्रतिष्ठा संरक्षण कलमानुसार गुन्हा

पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूममधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ च्या कलम ३,८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here