सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावामध्ये दोन कुत्र्यांनी कोल्ह्यावर हल्ला करुन त्याचे लचके तोडले. तिथल्या शेतकऱ्याने वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने त्वरितत कोल्ह्यावर उपचार सुरु केले.
वडाळा गावाच्या पुढे १० किलोमीटर दूर पडसाळी गावातील शेतामध्ये ही घटना घडली. मका व ऊसाच्या शेतात दोन कुत्रे कोल्ह्यावर हल्ला करत होते. या हल्ल्यामुळे कोल्ह्याला उभा राहता येत नव्हते. शेतकरी सचिन राऊत यांनी कुत्र्यांना दगड मारत तिथून हुसकावून लावले. कोल्ह्याच्या पायाला बांधून लगेच वन विभाग व सुरेश क्षीरसागर यांना याची माहिती दिली.
काही वेळात वन विभागाने गाडी पाठविली. कर्मचाऱ्यांनी कोल्ह्यावर प्रथमोपचार केले. कुत्र्यांनी कोल्ह्याला अनेक ठिकाणी चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे उपचारासाठी सिद्धेश्वर वन विहार येथे कोल्ह्याला नेण्यात आले. वन विभागाकडून कोल्ह्यावर आता उपचार सुरु आहेत.