विकसित भारत संकल्प यात्रेस कोल्हापुरातही विरोध, भाजप समर्थक-विरोधकांमध्ये वादावादी

0
145

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली पाठोपाठ येथील सोन्या मारूती चौकात गुरूवारी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला जोरदार विरोध झाला.

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद यादव, जीवन बोडके, बिजली कांबळे यांनी विरोध करीत जनतेच्या पैशातून मोदी आणि भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप केला.

केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार करीत असताना केंद्र सरकार न म्हणता मोदी सरकार असे का फलकावर लिहिले अशी विचारणा त्यांनी करताच यात्रेचे समन्वयक निरूत्तर झाले. यावेळी भाजप समर्थक आणि विरोधकांमध्ये थोडावेळ वादावादी झाली.

केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा शहरातून काढत आहे. यावर नाहक सरकारी निधी खर्च केला जात असल्याचा काही जणाचा आरोप होत आहे.

यातून यात्रेला विरोध होत आहे. सोन्या मारूती चौकात यात्रा आल्यानंतर सामाजिक कायकर्ते यादव, बोडके, कांबळे तिथे जावून पोहचले. त्यांनी समन्वयक अधिकाऱ्यांना भेटून प्रश्नांची सरबत्ती केली.

केंद्र सरकारच्या योजना असताना मोदींच्या योजना असे का म्हणत आहात ? असे का फलक लावला आहे ? मोदी स्वत: खिशातून प्रचारासाठी पैसे खर्च करीत आहेत का ? असे प्रश्न यादव यांनी समन्वयकांना विचारला.

यावर समन्वयकांनी जनतेचा पैसा असल्याचे मान्य केले. जनतेचा पैसा असेल तर मोदी सरकार असे का म्हणता ? अशी विचारणा केल्यानंतर ते निरूत्तर झाले. यावेळी भाजप समर्थक आले.

त्यांनी कोणीही विरोध करू शकत नाही, असे म्हणत विरोधकांशी वाद घालू लागले. यावेळी विरोधक आणि समर्थकांत वादावादी झाली. त्यानंतर यादव, बोडके, कांबळे यांनी जनतेच्या पैशातून भाजप, मोदी यांचा प्रचार सुरू असल्याचा आरोप करून निषेध नोंदवला आणि निघून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here