कोल्हापूर : विविध शासकीय कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गुरुवारी रिकामी टेबल आणि खुर्च्याच पाहायला मिळाल्या. निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामकाज ओढून नेले.
वारंवार नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आलेल्या लोकांना संप मिटल्यावरच कामासाठी या असे सांगण्यात आले. तहसिलदार व नायब तहसिलदारांनी गुरुवारी एक दिवस सामुहिक रजा घेऊन संपाला पाठिंबा दिला.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, महसूलचे वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे एरवी नागरिकांची गर्दी, सुनावण्या, मोबदला, जमीनीशी संबंधित कामे अशा विविध कारणांनी गजबजलेला असणाऱ्या परिसरात गुरुवारी शब्दश: शुकशुकाट होता.
महसूलमधील एकाही विभागातील कर्मचारी कामावर नव्हता. संपाची माहिती नसलेले नागरिक रिकामी कार्यालय बघून इकडे तिकडे फिरत होते, त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सध्या संप सुरू आहे, तो मिटल्यानंतरच या अशी माहिती देत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सर्व विभागातील कामकाज रेटून नेण्यासाठी प्रत्येकी एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर जबाबदारी दिली. तसेच वर्ग अ व ब श्रेणीतील कर्मचारी म्हणजेच अधिकारी संपात सहभागी नव्हते.
शासकीय वाहने आवारात जणू निवांत पहूडली होती. त्यामुळे ना नागरिकांची वर्दळ होती, ना कर्मचाऱ्यांची लगबग होती, ना वाहनांचा आवाज होता. सगळीकडे शुकशुकाट होता.