नवी दिल्ली : ‘चंद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेनंतर आता भारताने चंद्राच्या संशोधनासाठी पुढचे पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा विचार ‘ इस्रो’ ही भारताची अवकाश संशोधन संस्था करत आहे.
ती मोहीम येत्या चार वर्षांच्या आत पार पाडण्याचे ध्येय ‘इस्रो’ने ठेवले आहे.
ही माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात (आरबीसीसी) येथे गुरुवारी एका व्याख्यानात दिली.
ते म्हणाले की, चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने पृथ्वीवर आणण्याची मोहीम अतिशय गुंतागुंतीची आहे. चंद्रावर अवकाशयान पोहोचल्यानंतर त्याने तेथील दगड व अन्य गोष्टींचे नमुने गोळा करण्याचे काम स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्या प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. या मोहिमेची आखणी करण्याचे काम सध्या ‘इस्रो’ने हाती घेतले आहे.
२६ जानेवारीच्या संचलनात ‘चंद्रयान-३’
येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती सर्वांना पाहता येणार आहे. याबाबतची माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रावर पाठविलेल्या ‘चंद्रयान-३’च्या प्रत्यक्षातील आकाराएवढीच ही प्रतिकृती बनविण्यात येणार असल्याचेही सांगितले.