कोल्हापूर : आपल्या मुलीच्या वाट्याला कुणामुळे तरी दुर्देवी आयुष्य आले परंतू गोरगरिबांच्या मुली शिकल्या तर तीच आपल्या मुलीची खरी आठवण ठरेल या भावनेतून त्या मुलीचे आईवडिल गेली कांही दिवस मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत.
शिवाजी विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतून शिकणाऱ्या मुलींना अभ्यासिका बांधण्यासाठी त्यांनी तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी देवू केला आहे. ॲड राम पणदूरकर आणि ॲड हेमकिरण पणदूरकर असे त्यांचे नांव. ॲड रुपाली पणदूरकर या मुलीच्या नांवे ही अभ्यासिका होत आहे. शिवाजी विद्यापीठाचा आज हिरक महोत्सवी दीक्षांत समारंभ होत आहे.. पणदूरकर कुटुंबीयासारख्या अनेकांच्या मदतीतून विद्यापीठाची वाटचाल समृद्ध झाली आहे.
हे पणदूरकर कुटुंब मुळचे कोकणातील सावंतवाडीचे वकिल घराणे म्हणून प्रसिध्द. ॲड सुभाष पणदूरकर हे प्रसिध्द वकिल. ॲड राम पणदूरकर हे विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले.
ते स्वत: एलएमएम. पत्नीही वकील. रुपाली त्यांची एकुलती मुलगी. तिने बॅचलर ऑफ सोशल लॉ केले. त्यानंतर एलएमएम, एलएलबी आणि पीएच. डी केली.
ॲड संतोष शहा यांच्याकडे तिने महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीचा सामाजिक अभ्यास केला. तिला सतार वादनाचीही आवड होती. सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायदीप या संशोधन पत्रिकेतही तिचे लेख प्रसिध्द झालेले. तब्बल चौदा वर्षे तिने कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात वकीली केली. परंतू वैवाहिक आयुष्यात आलेल्या वेदनादायी अनुभवानंतर तिने आयुष्य संपवले.
पणदूरकर कुटुंबियांना त्याचा मोठा मानसिक धक्का बसला. परंतू त्यातून ते सावरले आणि रुपालीसारख्याच अन्य मुलींचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न करायचा निर्धार त्यांनी केला. त्यानुसार गेली दहा वर्षे हे कुटुंबिय लेक लाडकी अभियानांतगर्त प्रत्येकी दहा हजार रुपयांची पोस्टात खाती काढून मदत करते.
पुण्यातील महर्षि कर्वे संस्थेला त्यांनी मदत केली. आर्थिक अडचणीअभावी कुण्या मुलीचे शिक्षण थांबले असल्याचे त्यांना समजले तर ते मदतीसाठी धावतात. समाजातील मुलीमध्येच ते आता रुपालीचे आयुष्य शोधत आहेत.
हल्लीच्या जगात खिशात कितीही पैसा असला तरी कुणी कुणासाठी ३५ रुपये काढून देत नाही. परंतू फक्त मुलीच्या आठवणीसाठी ३५ लाख रुपये विद्यापीठाला देवू करण्यासाठीही मोठं काळीज असलेले आईवडिल असावे लागतात. पणदूरकर दांपत्याकडे ही दानत आहे. त्यांच्या मदतीतून अनेक मुलींंचे शैक्षणिक भविष्य घडण्यास हातभार लागणार आहे. वेदनेतूनही सृजनाचा अंकूर फुलावा तो असा..