कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील कागल-सातारा पॅकेज-१ अंतर्गत शिरोलीतील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकून काम करण्याला असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने विरोध केल्यामुळे नव्याने सुरू असलेला सुधारित आराखडा केंद्र, तसेच राज्य सरकारची पूरनियंत्रणासंदर्भातील नियमावलींनुसार आणि वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसारच करावा, अशी नवी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने शनिवारी ई-मेलद्वारे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
या सूचना न पाळल्यास कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा धोका कायमस्वरूपी राहील, असा इशाराही दिला आहे.
शिरोली येथील नवीन पूल सध्याच्या पुलापेक्षा १० ते ११ फूट उंच अणि बास्केट ब्रिज त्यापेक्षाही जास्त म्हणजे अंदाजे १८ फूट उंचावर बांधण्यासाठी त्या प्रमाणात दोन्ही बाजूंना भरावाचे नियोजन आहे. याला असोसिएशनने विरोध केला आहे.
जागतिक तापमानवाढ व हवामानातील बदल यामुळे बदललेल्या पर्जन्यवृष्टीचे स्वरूप पाहता केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, या नियमावलीला डावलून कोल्हापुरातील काम करण्यात येत असल्याची भीतीही असोसिएशनने या पत्रात व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचे पूरनियंत्रणसंबंधी २०१८ मधील परिपत्रक, तसेच २०१५ मधील जल संसाधने विभागाचे परिपत्रक, इंडियन रोड काँग्रेस कोडमधील मार्गदर्शक तत्त्वे, निषिद्ध क्षेत्र (ब्लू लाइन) आणि नियंत्रण क्षेत्रातील (रेड लाइन) मार्गदर्शक तत्त्वे, तसेच वडनेरे समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार असंख्य नियमावली आहे. त्याला डावलले जात आहे, असा आरोप असोसिएशनने केला आहे.
यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, तसेच प्राधिकरणासंबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे; परंतु ठोस कार्यवाही झालेली नाही. याशिवाय महापुरात महामार्गावरील नदीवरील पूल बांधताना वाहतूक सुरू राहावी, आपत्ती निवारणासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, अशाही सूचना असोसिएशनने केल्या आहेत.
भविष्यात निश्चित कालावधी ठरवून जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रातील पुलांबाबतीत ठोस धोरण ठरवून महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आराखडा बनवावा, तांत्रिक संस्था म्हणून असोसिएशनचा सहभाग यापुढेही राहील.-अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर