नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक झालेल्या आणखी ४९ खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं असून निलंबित खासदारांचा एकूण आकडा तब्बल १४१ वर पोहोचला आहे.
लोकसभेतून आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोन खासदारांचाही समावेश आहे.
निलंबनाची कारवाई झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती. मात्र छत्रपतींच्या नावाने मतं घेऊन सत्तेत आलेले हुकूमशहा मात्र शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघालेत.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, यासाठी संसदेत चर्चा करण्याची मागणी आम्ही करत होतो म्हणून हुकूमशाही पद्धतीने आमचं निलंबन करण्यात आलं,” अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
तसंच “आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील मावळे आहोत, संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. प्रसंगी आम्ही रस्त्याचं रणांगण करू, पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्राणपणाने लढू.
हाच निश्चय करत कांदा निर्यातबंदीच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सहकारी पक्षांच्या खासदारांसोबत संसद परिसरात आंदोलन केले,” अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.