कागल : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची मासिक पेन्शन पोस्टल बॅंकेद्वारे घरपोच करण्याचा निर्णय विशेष सहाय्य विभागाने घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहीती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
निरीक्षण गृहात राहणाऱ्या १८ वर्षांवरील मुलीनां लग्न होईपर्यंत, तसेच आईवडील नसणाऱ्या अनाथ मुलांना मासिक दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णयही शासन घेणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
कागल तालुक्यातील या योजनेत नव्याने पात्र झालेले लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप, तसेच केडीसीसी बॅंकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना कर्जमंजुरी पत्र वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, तहसीलदार जितेंद्र इंगळे, नायब तहसीलदार सूर्यवंशी काकासाहेब सावडकर, ज्योती मुसळे, मोरे, राजु माने आदी मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश व्हावा. यासाठी नियमामध्ये बदल करून तसा प्रस्तावित आर्थिक अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस याच्यांसमोर सादर केला आहे. स्वागत प्रास्ताविक भय्या माने यांनी केले.
अध्यक्षपदी भय्या मानेंचे नाव जाहीर..
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, लवकरच राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या समित्यांची घोषणा होणार आहे. कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना शिंदे गट या तीन पक्षांचे सदस्य या समितीत असतील. त्यांची नावे काय येतील ते येतील, पण अध्यक्षपदासाठी भय्या माने यांचे नाव निश्चित झाले आहे.