प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे (ता हातकणंगले )आणि भारत सरकारचा उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार विजेती कंपनी ‘ ऑग्रो झी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) या दोन संस्थामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. यामुळे भरडधान्य प्रक्रिया क्षेत्रात काम करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे.
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे केले जात आहे. भरड धान्याचा आहारातील वापर वाढवून लोकांना आरोग्यदायी जीवन देणे हा यामागील उद्देश आहे.
ही संकल्पना घेऊन उरूळी कांचन येथील तरुण कृषी पदवीधर महेश लोंढे यांनी ‘ऑग्रो झी ऑरगॅनिक्स’ या कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून भरड धान्यापासून विविध पारंपारिक तसेच आधुनिक पदार्थ त्यांनी तयार केले आहेत.
डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अन्नप्रक्रिया विभाग देखील अनेक बहुमूल्य अन्नपदार्थाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करत असतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या नवनवीन पदार्थांच्या निर्मितीमध्ये भरड धान्यापासून विविध पदार्थ तयार करावयाचा समावेश असावा या उद्देशाने ऑग्रो झी ऑरगॅनिक्स या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी बोलताना महेश लोंढे यांनी कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थ्याना पदार्थ निर्मिती बरोबरच भरडधान्य प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे व मशीन कशाप्रकारे निर्माण करू शकतात याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
बदलत्या हवामानामध्ये भरडधान्य उत्पादन घेणे महत्त्वाचे असून ज्वारी, बाजरी व इतर भरड धान्ये यांचे महत्व त्यानी विषद केले. भविष्यामध्ये महाविद्यालयासोबत प्रशिक्षण, औद्योगिक भेटी, विद्यार्थ्यांचे प्रकल्प या माध्यमातून काम करण्याचा मानस असल्याचा महेश लोंढे यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. वाय व्ही शेटे यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस बी पाटील, अन्नप्रक्रिया अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. पी डी ऊके, विद्यार्थी कल्याण अधिकारी श्री. ए. बी. गाताडे, श्री आर. पी. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.सामंजस्य करारावेळी तंळसदे येथील डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय चे महेश लोंढे, डॉ. आर. व्ही. पोवार, डॉ. वाय. व्ही. शेटे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.