कोल्हापूर : सौंदती येथील यात्रेसाठी मित्रांसोबत कारमधून जाताना पुणे-बंगळुरू महामार्गावर लक्ष्मी टेक येथे देवदर्शनासाठी रस्ता ओलांडताना भरधाव कारने उडवल्याने विलास महादेव चव्हाण (वय ६८, रा.
चव्हाण गल्ली, मार्केट यार्ड, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. २३) रात्री अकराच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास चव्हाण यांचे उद्यमनगर येथे वर्कशॉप आहे. ते दरवर्षी मित्रांसोबत सौंदती यात्रेला जात होते. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ते मित्रांसोबत कारमधून सौंदतीला जाण्यासाठी कोल्हापुरातून बाहेर पडले.
लक्ष्मी टेक येथे लक्ष्मी मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यासाठी कार महामार्गाच्या बाजूला थांबली. चव्हाण हे कारमधून उतरून रस्ता ओलांडून मंदिराच्या दिशेने जाताना कागलच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारने त्यांना उडवले. सुमारे १५ ते २० फूट हवेत उडून चव्हाण रस्त्यावर पडले.
हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी धाव घेऊन पाहिले असता, चव्हाण गंभीर अवस्थेत पडले होते. त्यांनी तातडीने चव्हाण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
सीपीआरमध्ये पोहोचताच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातामुळे मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. धडक देऊन कारचालक निघून गेल्याचे चव्हाण यांच्या मित्रांनी सांगितले