कोल्हापूर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम मंदिराचे सोमवारी २२ जानेवारी २०२४ ला उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रत्येक घराघरांत हा सोहळा साजरा व्हावा.
याकरिता थ्रीडी श्रीराम मंदिर निर्माण पुस्तिकेची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मंदिर बनवून संपूर्ण कुटुंबालाही या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
क्षीरसागर म्हणाले, या पुस्तिकेमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनविण्याचे क्यूआर कोडद्वारे चित्रीकरण व तंत्र आणि साहित्य देण्यात आले आहे. पुस्तिकेमध्ये दिलेले मंदिराचे भाग एकत्र जोडून कुटुंबातील सर्व जण एकत्र मिळून मंदिराची प्रतिकृती बनवू शकतात
या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रूपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा आदी पुरविण्यात आले आहे.
देशात अशी संकल्पना प्रथमच कोल्हापुरात राबविली जात असून ही पुस्तिका क्षीरसागर यांच्यामार्फत मोफत दिली जाणार आहे. पन्नास हजारांहून अधिक पुस्तिका घरोघरी पोहोचविल्या जाणार आहेत.
पुस्तिकेसाठी २८ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी नोंदणी काउंटर व व्हॅन उपलब्ध केली जाणार आहे. ही पुस्तिका १६ जानेवारीपर्यंत रामभक्तांना घरपोच मिळणार आहे.
बनविलेले थ्रीडी राम मंदिरसोबत आपल्या कुटुंबाचा एक सेल्फी पाठवावयाचा असून, यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून १० कुटुंबांना अयोध्येला जाण्याची संधी दिली जाणार आहे.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, पुस्तिकेची छपाई करणारे साईप्रसाद बेकनाळकर, शारदा बामणे, संतोष कंदारे, हिंदू एकता पदाधिकारी दीपक देसाई, गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, पतीतपावनचे अवधूत भाट्ये, अप्पा बनेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.