कोल्हापूर : वर्षाचा अखेरचा दिवस तसेच नाताळ साजरा करण्याच्या बहाण्याने सलग सुट्यांची संधी साधत भाविक आणि पर्यटकांनी कोल्हापूर गजबजलेले आहे.

0
52

कोल्हापूर : वर्षाचा अखेरचा दिवस तसेच नाताळ साजरा करण्याच्या बहाण्याने सलग सुट्यांची संधी साधत भाविक आणि पर्यटकांनी कोल्हापूर गजबजलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि त्याच्या नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे.

दरवर्षी उन्हाळा, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यंदाही भाविक आणि पर्यटकांना शनिवार, रविवारला जोडून नाताळची सोमवारची सुटी मिळाल्यामुळे सलग तीन दिवसांचा कालावधी सहलीसाठी मिळालेला आहे.

त्यातच वर्षअखेरीलाही शनिवार आणि रविवारची सुटी येत असल्यामुळे हा संपूर्ण आठवडा कुटुंबीयांसमवेत तसेच मित्रमैत्रिणींसोबत सुटी घालवण्याची संधी मिळालेली आहे. शुक्रवारी सायंकाळपासूनच पर्यटनासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक सहकुटुंब कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दी

अंबाबाई, जोतिबा या तीर्थक्षेत्रांसह जोतिबा डोंगर, किल्ले पन्हाळा, कणेरी मठ, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, रामलिंग डोंगर, चांदोली, राधानगरी अशी पर्यटनस्थळे पुन्हा बहरली आहेत. अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस या ठिकाणांकडे भाविक आणि पर्यटकांचा विशेष ओढा आहे.

वाहतुकीची कोंडी

शुक्रवारी दुपारपासून मुंबई-पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील वाहने कोल्हापुरात दाखल होऊ लागल्याने महामार्गावर तसेच कोल्हापूर प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या रांगा लागल्या. शहरात अंबाबाई मंदिराला जोडणारे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, दसरा चौक, सीपीआर, मिरजकर तिकटी, शनिवार पेठ, रंकाळा या ठिकाणी सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती.

वाहनतळेही हाऊसफुल्ल

महामार्गापासून शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. कोल्हापुरातील बिंदू चौक, खासबाग मैदान, शाहू मैदान परिसरातील वाहनतळांवर वाहनांची गर्दी आहे. दसरा चौकात तर वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. शिवाय शहरात रस्तोरस्ती वाहने लावलेली दिसून येत आहेत. भाड्याने गाड्या घेऊन कोल्हापुरात मुक्काम करून जवळच्या कर्नाटक, गोवा, कोकण येथेही जाण्याचे अनेकांनी नियोजन केलेले आहे.

हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा हाऊसफुल्ल

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरातील हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. महामार्गावरील धाबे, हॉटेल्स पर्यटकांनी भरलेले आहेत. याशिवाय रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, धर्मशाळा, भक्तनिवास याठिकाणीही हाऊसफुल्ल गर्दी होती.

पन्हाळगडावर १६ हजार पर्यटकांची भेट

ऐतिहासिक पन्हाळगडावर गेल्या तीन दिवसांत सरासरी १६ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. रविवारी सर्वाधिक लोकांनी पन्हाळ्याला भेट दिली. यात सर्वाधिक सहलींचा समावेश आहे, अशी माहिती पन्हाळा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पन्हाळगड दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची आकडेवारी
शुक्रवार – ३,०००
शनिवार – ५,०००
रविवार – ८,०००

गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची अंबाबाई मंदिर परिसरात रीघ लागली आहे. रविवारीही दिवसभरात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. –महादेव दिंडे, व्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here