सातारा-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा, पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

0
71

सातारा : गेल्या तीन दिवसांपासूनच्या सलग सुट्या संपल्यानंतर जिल्ह्यात पर्यटनाला आलेले पर्यटक आणि गावी आलेले चाकरमानी सोमवारी सायंकाळी माघारी फिरले. त्यांच्या वाहनांमुळे साताऱ्यापासून पुण्यापर्यंत महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कऱ्हाड तालुक्यात मलकापूर येथे पुलाच्या बांधकामामुळे आधीच असलेल्या वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडली. तर महाबळेश्वर, पाचगणीसह इतर पर्यटनस्थळांवरून माघारी निघालेल्या पर्यटकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी मलकापूरजवळ कंत्राटदाराने नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी रविवारी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्हीही लेनवरील वाहतूक उपमार्गावर वळवली. त्यातच सुटी संपवून चाकरमानी कामावर जाण्यासाठी निघाल्याने सोमवारी महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. रस्ता अरूंद व पुलाचे काम आणि वाहनांची वर्दळ यामुळे ठिकठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नाताळच्या सुट्यांमुळे बहरलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीतून पर्यटकांची तुफान गर्दी व वाहनांचा ताफा जिल्ह्याबाहेर निघाला होता. सोमवारी ख्रिसमस सुटी आल्याने पर्यटकांची गर्दी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यास मिळाली. सहानंतर बऱ्यापैकी महाबळेश्वरमधील पर्यटकांची वर्दळ परतीच्या मार्गे जाताना दिसून आली. जाताना पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदी करताना दिसून येत होते.

पाचगणीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना

पाचगणीत सलग सुट्या आणि नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी-महाबळेश्वर गर्दीने ओसंडून वाहिले. परंतु, जाताना पर्यटकांच्या गर्दी बरोबरच वाहनांच्या गर्दीने वाहतुकीचे तीन तेरा वाजले. महाबळेश्वर ते पाचगणी आणि पाचगणी ते वाई पसरणी घाटात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वरहून पाचगणीत पोहोचण्यासाठी दोन तास लागत होते. त्यामुळे पर्यटकांबरोबरच वाहनचालक त्रस्त झाले. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना तसेच स्थानिक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here