रणरागिणी! वाघाचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मैत्रिणींनी दाखवली हिंमत, वाचवला जीव

0
111

उत्तराखंडमधील टनकपूर येथे वाघाने एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केलं. यावेळी तिच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी हिंमत दाखवून आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे अखेर वाघ तिथून पळून गेला.

त्यानंतर दोन्ही महिला आपल्या मैत्रिणीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन गेल्या. उचौलीगोठ परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या तीन महिला गवत गोळा करण्यासाठी जंगलात आल्या होत्या. त्यानंतर तिथे दबा धरून बसलेल्या एका वाघाने गीतादेवीवर जीवघेणा हल्ला केला. गीतादेवीसोबत आलेल्या पार्वती आणि जानकी देवी यांनी हे सर्व पाहिलं तेव्हा काहीही विचार न करता त्या आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे आल्या. आजूबाजूचे कोणीतरी येऊन मदत करेल म्हणून तो आरडाओरडा करू लागल्या.

महिलांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे वाघानेच तेथून पळ काढला. त्या दोघीही लाकूड आणि दगडांनी वाघावर हल्ला करत होत्या. वाघ तिथून पळून जाताच गीतादेवी गंभीर जखमी झाल्याचे जानकी आणि पार्वतीने पाहिले. दोघींनी गावकऱ्यांच्या मदतीने गीताला जवळच्या रुग्णालयात नेलं. जिथे गीतादेवीच्या डोक्याला 21 टाके घालावे लागले. उपचारानंतर आता गीता यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र त्यांना हल्द्वानी येथील सुशीला तिवारी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवणाऱ्या जानकी आणि पार्वती यांचा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. टनकपूरमध्ये वाघाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय काही दिवस जंगलात जाणे टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. परिसरात गस्त वाढवण्यात येणार असल्याचं रेंजरने सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here