कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये पहिल्या टप्प्यात निवडक सहा गावांचा समावेश करण्यात येणार असून येत्या आठ दिवसात त्याबाबत निर्णय होईल. उर्वरित गावांबाबत लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार नाही, आपण तरी त्यामध्ये भाग घेणार नसल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर शहरातील ८० किलोमीटरच्या रस्त्याचा प्रश्न असून त्यासाठी महापालिकेने मूलभूत योजनेतून निधी मिळण्याबाबत ९० कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरच मंजुरी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील विविध कामांचा आढावा शुक्रवारी मंत्री मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अपर आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त केशव जाधव, शिल्पा दरेकर, साधना पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.
हद्दवाढीत जाऊ शकणारी गावे..
कळंबा, आर. के. नगर, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, बालिंगा
१० जानेवारीपर्यंत पूर्ण दाबाने पाणी
पाणी थेट पाइपलाइनचे दोन पंप सुरू झाले आहेत, तिसरा पंप १० जानेवारीपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. चंबुखडी पाइपलाइनसाठी क्रॉस कनेक्शन पूर्ण होईल. ‘आयआयटी’ मुंबई यांच्यावतीने बाराईमाम, लक्षतीर्थ, ब्रम्हपुरी या भागात तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. प्राथमिक निरीक्षणानुसार मुख्य जलवाहिनी, चंबुखडी येथे व्हॉल्व्ह बदलण्याची सूचना केली आहे, त्यासाठी एक कोटी खर्च अपेक्षित असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी देणार
अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी ६९ पैकी १० कोटी प्राप्त झाले असून ४० कोटी पुरवणी यादीत मंजूर झाले आहेत. यामध्ये तीन मजली पार्किंग, भक्तनिवास होणार आहे. मंदिर परिसर निधीसाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहे. तीर्थक्षेत्र आराखड्याच्या पूर्ततेसाठी जिल्हा नियोजनामधून निधी देणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात शहरातील विविध योजना :
- अमृत पाणीपुरवठा योजना :
- योजना : ११६.७१ कोटी
- पूर्तता : १२ उंच टाक्यापैकी ३ पूर्ण, ३९६ किलो मीटर पैकी २९१ किलो मीटरची पाइपलाइन पूर्ण
- पूर्ण कधी होणार : ३१ मार्च २०२४
- ड्रेनेज योजना :
- योजना : ७०.७७ कोटी
प्रस्तावित कामे :
- दुधाळी झोनमध्ये ७८ किलोमीटर पैकी ६८ किलोमीटरचे काम पूर्ण.
- ४ एमआयडी एसटीपी कसबा बावडा काम पूर्ण
- ६ एमआयडी एसटीपी दुधाळी ६० टक्के काम पूर्ण
- मोठे नाले आडवले, छोट्या आठ पैकी दोन नाल्यांचे काम ‘अमृत’मधून पूर्ण
- अमृत भाग-२ योजना (प्रस्तावित) :
- योजना रक्कम : ३४८ कोटी
- शहराच्या उर्वरित विस्तारित भागात ड्रेनेज लाईन टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे, एसटीपी बांधणे.
शाहू मिलच्या जागेबाबत लवकरच चर्चा
शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक प्रलंबित आहे. ही जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळची असून त्याची किंमत ४१० कोटी रुपये आहे. राज्याचे वस्त्रोद्येाग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.