कोल्हापूर: सोशल मिडियाच्या अतिरकी वापरामुळे सांस्कृतिक चळवळ, नाट्य, कला आणि क्रीडा या क्षेत्राकडील तरुणांईचा ओढा कमी झाला आहे. असे असले तरी कोल्हापूरात सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे.
येथील नाट्यचळवळीला कोल्हापूरकर चांगला प्रतिसाद देतील आणि चांगल्या नाटकांची पर्वणी साधतील अशी अपेक्षा आमदार जयश्री जाधव यांनी मंगळवारी व्यक्त केली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या कोल्हापूर गट कार्यालयामार्फत सुरु झालेल्या ६९ व्या नाट्यमहोत्साच्या प्राथमिक स्पर्धांचे उद्घाटन आमदार जाधव आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते प्रतिकात्मकरित्या नाटकाची घंटा वाजवून झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अध्यक्षस्थानी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर होते.
केसरकर यांनी कामगारांच्या उपक्रमांसाठी कोल्हापुरात कामगार भवन निर्माण व्हायला हवे असे मत व्यक्त केले. प्रसंगी स्पर्धा परीक्षक नरहर कुलकर्णी, रविदर्शन कुलकर्णी, मदन दंडगे हे जेष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुणवंत कामगार, रंगकर्मी, पत्रकार, इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा वाजवून करण्यात आले. ही स्पर्धा २ ते २५ जानेवारी सायंकाळी ७ वाजता असणार आहे.
सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे. प्रास्ताविक पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी आभार मानले. निवेदन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केले. कार्यक्रम आयोजनात चंद्रकांत घारगे, सचिन खराडे, दिपक गावराखे, संघसेन जगतकर, सचिन शिंगाडे, विजय खराडे, अशोक कौलगी, कर्मचारी उपस्थित होते.