स्वीटमार्ट मालकाच्या खुनातील आणखी तीन गुंडांना अटक करा, बघेल यांच्या नातेवाईकांची मागणी

0
88

कोल्हापूर : उद्यमनगर येथील श्रीराम स्वीटमार्टचे मालक शिवकुमार बघेल यांना मारहाण करण्यात आणि त्यांना वेळोवेळी त्रास देण्यात आणखी तीन गुंडांचा सहभाग होता. त्यांना अटक करून व्यावसायिकांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी बघेल यांचे नातेवाईक आणि यादवनगरातील महिलांनी मंगळवारी (दि.

२) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मारला. पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

स्वीटमार्टमधील पदार्थ फुकट खायला देत नसल्याच्या कारणावरून यादवनगर परिसरातील काही फाळकूटदादांनी मिठाई व्यावसायिक शिवकुमार बघेल यांना बेदम मारहाण केली होती.

मारहाणीत गंभीर जखमी झालेले बघेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारहाण करणारे प्रथमेश शिंगे आणि दिलीप पाटील या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

मात्र, या गुन्ह्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचा दावा बघेल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या तिघांना अटक करून फिर्यादीत त्यांच्या नावाचा समावेश करावा, अशी मागणी बघेल यांचे नातेवाईक आणि यादवनगरातील महिलांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी राजारामपुरी पोलिस आणि पोलिस अधीक्षकांना दिले. यावेळी ५० ते ६० महिलांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मारला. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच व्यावसायिक असुरक्षित बनले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी पप्पू बघेल, पप्पू शर्मा, विजयसिंह ठाकूर, संजय शर्मा, विनोदकुमार वर्मा, देवेंद्रसिंह ठाकूर, सखूबाई माळी, विजया पोवार, नीलम कांबळे, मंगल माळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले

बघेल यांचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर गुंडांनी त्यांना फिर्याद देण्यापासून रोखले होते. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी दिलेली फिर्याद मागे घ्यावी, यासाठी गुंडांनी दबाव टाकला. फिर्याद मागे घेतली नाही तर पेटवून मारू, असे त्यांनी धमकावल्याची माहिती बघेल यांच्या नातेवाईकांनी दिली. दोन संशयितांच्या अटकेनंतर त्यांच्या नातेवाईकांकडूनही दमदाटी होत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली.

व्यवसाय करायचा की नाही?

अनेक परप्रांतीय व्यावसायिक कष्ट करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांच्या कष्टाच्या पैशांवर गुंडांचा डोळा आहे. चार-सहा दिवसांनी कोणीतरी नवीन गुंड येऊन दमदाटी करतो. पैसे दिले नाहीत तर व्यवसाय बंद करण्याची धमकी देतो. आम्ही व्यवसाय करायचा की नाही..? असा सवाल त्यांनी पोलिसांसमोर उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here