कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सत्तारूढ गटाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मंगळवारी रात्री भेट घेतली.
पोलिस अधीक्षकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दारात थांबून होते.
भेटीनंतर महाडिक म्हणाले, राज्यातील सत्ता बदललेली आहे हे माजी गृहराज्यमंत्री विसरले आहेत. राजकीय वैरत्व जरूर असावे; परंतु अशा पद्धतीने एकमेकांवर हात उगारणे योग्य नाही. महाडिक परिवाराने अशा पद्धतीने कुणालाच कधी मारहाण केलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संयमाने राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. योग्यवेळी आल्यावर त्याला उत्तर दिले जाईल.
त्यांना कारखान्याच्या निवडणुकीतील पराभव पचवता आला नाही. नियोजन पद्धतीने त्यांनी हा हल्ला केला आहे. त्याचे चित्रीकरणही त्यांनी केली आहे. घडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानांवरही याची माहिती घातली आहे. मारहाणीचे फुटेज व नावे पोलिसांना मिळाली आहेत