मुंबई/डॉ. कृष्णदेव गिरी
आपली मातृभाषा मराठीचा शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त वापर व्हावा. त्यातून मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारच्या विभागीय, जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांना मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.
मराठी भाषेचा प्रसार व प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत
जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई-बुक, ऑनलाईन विक्री, लेखक- प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, डॉक्युमेंटरी लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्यानिमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.