कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना ‘स्कार्पिओ’ गाड्या दिल्या होत्या. आज, त्या गाड्यांची अवस्था खूपच वाईट असून तीन जिल्हाध्यक्षांकडून फिरून ए.
वाय. पाटील यांच्याकडे आलेली गाडी सध्या गॅरेजला लावून आहे. तर, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्याकडील गाडी दुरुस्तीसाठी कंपनीत सोडलेली होती, ती गेली अनेक वर्षे तिथेच आहे. पक्ष नवीन गाड्या देतो, पण त्याच्या इंधनासह देखभाल दुरुस्तीचा खर्च पदाधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतो.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने राज्यातील जिल्हाध्यक्ष व महानगर शहराध्यक्षांना आलिशान गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पक्षाने यापूर्वी दिलेल्या गाड्यांची अवस्था खूपच वाईट आहे. पक्ष विस्तारासह निवडणुकांच्या काळात पदाधिकाऱ्यांना जिल्हाभर फिरावे लागते. यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना गाड्या प्रदान केल्या होत्या. त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून स्वर्गीय लेमनराव निकम तर शहराध्यक्ष म्हणून आर. के. पोवार कार्यरत होते.
दरम्यानच्या काळात जिल्हाध्यक्ष निकम यांच्या राजीनाम्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांच्याकडे गाडी गेली. त्यांच्यानंतर ए. वाय. पाटील हे जिल्हाध्यक्ष झाले आणि गाडी त्यांच्याकडे गेली. तोपर्यंत गाडीचा खुळखुळा झाला होता. त्यांनी थेट गॅरेजला नेऊन लावली.
शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी काही काळ गाडी वापरली, तोपर्यंत पक्षाने शहराध्यक्ष पदी राजेश लाटकर यांना संधी दिली. गाडी त्यांच्याकडे गेली, तोपर्यंत गाडीची कामे निघाली. त्यांनी संबधित कंपनीत कामासाठी सोडली. तोपर्यंत त्यांना बाजूला करून ‘आर. के.’ पुन्हा शहराध्यक्ष झाले. त्यांनी गाडीचा शोध घेतला तर गाडी कंपनीत असल्याचे समजले. त्यांनी कंपनीत संपर्क साधला तर गाडी दुरुस्तीचा खर्च चार लाख सांगितल्यानंतर त्यांनी गाडी तिथेच सोडली.
सत्तेतील पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा
सत्तेतील पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा अधिक आहेत. केवळ गाड्या देऊन त्याच्या इंधनासह चालक, देखभाल दुरुस्तीचा खर्चही अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे पक्षाने महिन्याला यासाठीचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
काँग्रेसनेही दिल्या होत्या गाड्या
काँग्रेस पक्षानेही आपल्या जिल्हाध्यक्षांना गाड्या प्रदान केल्या होत्या. त्यावेळी आमदार पी. एन. पाटील हे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी स्वत:ची गाडी वापरणेच पसंत केले.