कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
इचलकरंजी : प्रियकराने भांडणात गळा दाबून जखमी केलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. सुरेखा राजू सोलनकर (वय ३३, रा. चिपरी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन गौतम माने (रा.
इंदिरानगर झोपडपट्टी सांगली) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपासासाठी पथक रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील प्रियकर व प्रेयसी दोघेही मूळचे सांगलीचे. ओळखीतून दोघांचे ३ ते ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भेटण्यासाठी ते दोघे शहापूर येथील लक्ष्मीनगर गल्लीत ओमकार लोहार यांच्या मालकीच्या खोलीत येत होते.
त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून भांडणं व्हायची. भांडणातून सचिन हा सुरेखा यांना मारहाण करीत होता. शनिवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भांडणात माने याने सुरेखा यांना मारहाण केली.
मारहाणीत सचिन याने अंगावर धावून जात गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरेखा या बेशुद्ध झाल्याने त्यांना तिथेच घरात कोंडून बाहेरून दार लावून तो पळून गेला.
थोड्यावेळाने तेथे आलेल्या एकाने महिला बेशुद्ध अवस्थेत खोलीत पडल्याचे पाहून खोली मालक व पोलिसांना कळवले. पोलिसांनी जखमी सुरेखा यांना आयजीएम रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते.
तेथे उपचारादरम्यान गुरुवारी सुरेखा यांचा मृत्यू झाला. सुरेखा यांचा भाऊ कृष्णा भूपाल दुधाळ (वय ३३) यांच्या फिर्यादीनुसार सचिन माने याच्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये खुनाचा गुन्हा अधिक करण्यात आला असून, सचिन याच्या तपासासाठी शहापूर पोलिसांनी पथके सांगली परिसरात रवाना केली आहेत.