दोन वेगवेगळ्या घटनेत वृद्धासह तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. देवल्या होन्या बिलकुळे (वय ६५) आणि रोहित गोरख पाटील (वय २३) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.
शुक्रवारी पोलिस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
वृद्धाची आत्महत्या :
साक्री तालुक्यातील बसरावळ येथील देवल्या होन्या बिलकुळे या ६५ वर्षाच्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
राहत्या घरात दारूच्या नशेत छताच्या लोखंडी अँगलला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. घटना लक्षात येताच त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. देवल्या बिलकुळे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने दारूच्या नशेत यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. आर. पिंपळे घटनेचा तपास करीत आहेत.
तरुणाची आत्महत्या:
शहरानजिक मोहाडी उपनगरातील राजारामभाऊ नगरात वास्तव्यास असणारा राेहित गोरख पाटील या २३ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
राहत्या घराच्या पुढील रुममध्ये छताच्या कढीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याला तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात रात्री ९ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शिरसाठ करीत आहेत.
दरम्यान, दोघांनी आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस तपास करीत आहेत.