कोल्हापूर : जय शिवाजीच्या जयघोषात शनिवारी प्रादेशिक सेनेच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी किल्ले ते किल्ले सायकल मोहिमेस प्रारंभ झाला. कोल्हापुरातील मराठा बटालियनच्या संभाजी चौकात प्रमुख पाहुणे शाहू छत्रपतींनी या मोहिमेसाठी झेंडा दाखवला.
या मोहिमेत सहभागी झालेल्या १२ जवानांनी पहिल्या दिवशी पन्हाळगड आणि विशाळगड या किल्ल्यांना भेटी दिल्या.
१०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) मराठा लाईट इन्फंट्रीचा वर्धापन दिन २२ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता कोल्हापुरातील लष्कराच्या संभाजी चौकात झालेल्या या समारंभासाठी शाहू छत्रपती उपस्थित होते.
यावेळी मेजर जनरल एम. एन. काशीद, मेजर जनरल ए. बी. सय्यद, कर्नल बी. के. कलोली, ब्रिगेडियर ए. एस. वालिंबे, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल डी. एस. मंडलिक, कर्नल सिन्हा, आदी उपस्थित होते. मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी सेवारत, सेवानिवृत्त सैनिक तसेच त्यांचे कुटूंबिय आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
मोहिमेत १२ जण सहभागी
या मोहिमेत कोल्हापूर टेरियर्सचे मेजर बिपिनकुमार, नायब सुभेदार बसवराज पाटील या अधिकाऱ्यांसह हवालदार प्रदीप खांबे, नाईक महेश कोले पाटील, रोहित बडवे, लिपिक निखिल गगाळे, शिपाई अनुज जंगम, अनिल कुमार, संदीप कांबळे, जोतिबा पाटील, जोतिबा माने, नवनाथ पाटील सहभागी झाले.