कोल्हापूर : माता श्री रेणुका देवीला पौर्णिमेला वैधव्य आले.. आपल्या सांत्वनाने तिचे दु:ख थोडे हलके व्हावे, तिने या आघातातून सावरून भाविकांवर कृपा दृष्टी ठेवावी, पुन्हा जगदोद्धाराचे कार्य करावे..ही विनंती व देवीची साथ द्यायला आलेल्या कोल्हापुरकरांच्या अलोट गर्दीत शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा पार पडली.
मार्गशीर्ष पौर्णिमेला जमदग्नी ऋषींचा मृत्यू झाला, त्यादिवशी सौंदत्ती येथे झालेल्या यात्रेनंतर कोल्हापुरात ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा होते. एखाद्या कुटुंबात सांत्वनासाठी जाताना भाजी भाकरी, आंबील नेण्याची पद्धत आहे. इथे देवी रेणुकेच्या वाट्याला आलेल्या दु:खातून तिला सावरण्यासाठी कोल्हापुरात ही यात्रा होते. यानिमित्त पहाटे देवीचा अभिषेक व आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासूनच देवीचे दर्शन सुरु झाले. सकाळी ६ वाजल्यापासून नैवेद्य देण्यास सुरुवात झाली. वरणंवांग, मेथीची भाजी, बेसनाच्या वड्या, दही भात, आंबील, भाकरी, कांद्याची पात, लिंबू, गाजर हा या दिवसाचा खास नैवेद्य. नैवेद्यांने भरलेल्या बुट्ट्या घेऊन मंदिराच्या दिशेने येत होते.
सकाळी अकरा वाजल्यापासून तर महिला व पुरुष भाविकांच्या रांगा ओसंडून वाहत होत्या. रस्त्यावर दुतर्फा खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, घरगुती साहित्यांचे स्टाॅल मांडले होते. समोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या पाळण्यांसह अन्य खेळांचा आनंद बच्चे कंपनी घेत होती.
सहकुटूंब भोजनाचा आस्वाद
देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तिच्या सानिध्यात चार घास खाण्याची पद्धत कोल्हापूरकर अजूनही सांभाळतात. त्यामुळेच नैवेद्याबरोबर भाविकांनी सहकुटूंब जेवणाचा लाभ घेतला. मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कुटूंबांची पंगत सुरू होती.
नैवेद्य, नारळाचे योग्य नियोजन
भाविकांनी आणलेल्या नैवेद्याची नासाडी होऊ नये यासाठी यात्रा समितीने चोख नियोजन केले होते. भाविक रांगेत असतानाच नैवेद्य स्विकारले जात होते. तर मागील बाजूस नैवेद्य दुसऱ्या भाविकाला दिला जातो. त्यामुळे अन्नाची नासाडी झाली नाही. नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र मांडव उभारला होता. कापूर व अगरबत्ती लावण्याची सोय ही तेथेच करण्यात आली.