कोल्हापूर : गोरक्षकाचा पाठलाग करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेतील चार संशयितांना पेठ वडगाव पोलिसांनी विशेष ट्रीटमेंट पुरवली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरमध्ये आणले असता, त्यांना पोलिसांच्या परवानगीने मोबाइल पुरवण्यात आला.
पोलिसांच्या समोरच संशयित मोबाइलवर गप्पा मारत होते. पोलिसांकडून संशयितांना दिल्या जाणाऱ्या खास ट्रीटमेंटने सीपीआरमधील उपस्थितांचे लक्ष वेधले. हा प्रकार बुधवारी (दि. १६) सायंकाळी घडला.
चार दिवसांपूर्वी किणी टोल नाका येथे एका गोरक्षकास तीन ते चार जणांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पेठ वडगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर कारागृहात सोडण्यापूर्वी संशयितांना बुधवारी सायंकाळी वैद्यकीय चाचणीसाठी सीपीआरच्या अपघात विभागात आणले होते.
सीपीआरमध्ये पोहोचताच संशयितांना नातेवाईक आणि मित्रांनी गराडा घातला. पोलिसांच्या परवानगीने संशयितांना मोबाइल मिळाले. त्यानंतर वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संशयितांच्या मोबाइलवरून गप्पा सुरू होत्या. बेड्या घातलेल्या संशयितांना पोलिसांकडून मिळत असलेली विशेष ट्रीटमेंट पाहून उपस्थित आचंबित झाले. पोलिस कोठडीत संशयितांची चौकशी झाली की सरबराई झाली, अशीही चर्चा परिसरात सुरू होती.
याबाबत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी पी. एम. तांबे यांना विचारणा केली असता, त्यांनी चूक कबूल केली. पेठ वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर यांच्याकडे विचारणा केल्यानंतर, त्यांनी हा प्रकार गंभीर नसल्याचे सांगत मोबाइल वापरणारे संशयित आरोपी आणि त्यांना मोबाइल वापरास मुभा देणाऱ्या पोलिसांची पाठराखण केली.