कोल्हापूर : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त रविवारी आमदार पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौड व शेतकरी मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस प्रभारी कन्हैयाकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आमदार पाटील यांच्या वतीने प्रत्येक वर्षी २० ऑगस्टला माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड काढण्यात येते. या वर्षी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दसरा चौक येथून दीप प्रज्वलन करून सद्भावना दौडला सुरुवात होईल. माजी मंत्री व काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या दौडचा प्रारंभ होईल. यावेळी कन्हैयाकुमार, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दौडचा मार्ग दसरा चौक, बिंदूचौक, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, संभाजीनगर, कळंबा ते दिंडनेर्ली सूतगिरणी असा आहेे. सूतगिरणी स्थळावर शेतकरी मेळावा होणार आहे. मेळाव्यात मान्यवर नेते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यास मोठ्या संख्येने काँग्रेसप्रेमी जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.