नोटीसचा धसका, तेरा हजार अंगणवाडी कर्मचारी कामावर

0
94

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना उलटून गेल्याने कर्मचारी अस्वस्थ असून यातूनच सुमारे १३ हजार कर्मचारी सोमवारी दुपारपर्यंत कामावर हजर झाले होते. विविध बैठका आणि मोर्चा, आंदोलनातूनही शासनाने ताठर भूमिका घेतली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यापासून परावृत्त करताना संघटना नेत्यांचीही कसोटी लागली आहे.

आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यानंतर लगेचच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही आपले आंदोलन पुकारले. ‘मानधन नको, वेतन द्या’ या मागणीसह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २३ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

याला आता महिना उलटून गेला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ७४ हजार अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले होते. यानंतर मुंबईत आयोजित बैठकीतील चर्चा फिसकटली.

त्यानंतर नागपूर अधिवेशनावर मोर्चाही काढण्यात आला. तेथेही कोणताच निर्णय न झाल्याने ३ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानातूनही मोर्चा काढण्यात आला.

महिला व बालविकास आयुक्त रूबल अगरवाल यांनी सर्व जिल्ह्यांना पत्रे पाठवून अंगणवाडीच्या बालकांना द्यावयाच्या पोषण आहाराबाबत पर्यायी यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या. याच दरम्यान जे अंगणवाडी कर्मचारी दोन, तीन महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झाले आहेत. अशांना जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

आपण नव्यानेच नियुक्त झाला असून संपात सहभागी न होता आपण कामावर हजर व्हावे अन्यथा आपली सेवा समाप्त करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल, असे पत्र काढल्याने अनेक जिल्ह्यांतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. यातूनच मग अनेक ठिकाणी कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. राज्यभरातील सोमवारी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा १२ हजार ८७५ इतका होता.

  • राज्यातील एकूण अंगणवाड्या ७३ हजार ९४१
  • कामावर हजर झालेल्या सेविका ४ हजार ३९
  • एकूण अंगणवाडी मदतनीस संख्या ७५ हजार ८७१
  • कामावर हजर झालेल्या मदतनीसांची संख्या ८ हजार ८५
  • एकूण मिनी अंगणवाडी सेविका संख्या १२ हजार ४५०
  • हजर झालेल्या सेविका ७५१
  • एकूण हजर झालेले कर्मचारी १२ हजार ८७५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here