सुळकूड पाणी योजनेसंदर्भात १६ जानेवारीला मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

0
93

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेसंदर्भात १६ जानेवारीला मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समिती पाटील यांना काळे झेंडे दाखविणार होते. मात्र, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि पोलिसांनी शिष्टाई केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मंत्री पाटील यांनी टेक्स्पोजर २०२४ ला भेट देण्यासाठी पंचरत्न मंगल कार्यालयात आले असता त्यावेळी त्यांनी कृती समितीशी चर्चा केली. शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे.

त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांनी याला विरोध केला आहे. तसेच त्या भागातील नेत्यांचाही विरोध आहे. अनेकवेळा राज्य सरकारने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील हे इचलकरंजीत येणार असल्याचे कळाल्यानंतर कृती समितीने काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, पोलिस प्रशासन, माजी आमदार हाळवणकर यांच्या मदतीने पाटील यांच्यासोबत कृती समितीस चर्चेला बोलावून निवेदन स्वीकारले आणि कागल परिसरातील मंत्री यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, अभिजित पटवा, विजय जगताप, रसूल नवाब, सुनील बारवाडे, कौशिक मराठे, नागेश शेजाळे, उमेश पाटील, विद्यासागर चराटे, आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील येणार असल्याने पंचरत्न कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांची मंत्र्यासोबत भेट झाल्यानंतरही एका आंदोलनकर्त्याला काही वेळ तिथेच थांबवून ठेवण्यात आले होते.

टेक्स्पोजरला मंत्री पाटील यांची भेट

पंचरत्न कार्यालयामध्ये यंत्रमाग उद्योगासंदर्भात भरलेल्या मशिनरी प्रदर्शनाला वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. अत्याधुनिक यंत्रमागाची पाहणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here