“शिवरायांवरील महानाट्य” शिवगर्जनाच्या आयोजनाचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा बैठक व्यवस्था, वाहनतळ, सजावट तयारीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

0
95

कोल्हापूर:- कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर दिनांक १३ ते १५ जानेवारी दरम्यान शिवरायांवरील ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे.

या तिन्ही दिवशी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या दररोजच्या प्रयोगाला किमान दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

यासाठी बैठक व्यवस्था, वाहनतळ, अग्निशमन व्यवस्था, इतर आपत्ती तसेच सजावट तयारी बाबत अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसूळ, तहसिलदार स्वप्निल रावडे, नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मूतकेकर, तहसिलदार सूर्यकांत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, प्रमोद पाटील, अनिल तांदळे यांच्यासह शिवगर्जना महानाट्याच्या निर्मात्या रेणुका यादव, दिग्दर्शक स्वप्नील यादव उपस्थित होते.

या महानाट्यात २०० हून अधिक कलाकार, हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे, तर १४० फूट लांब आणि ६० फूट उंच असे भव्यदिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिषबाजीही असणार आहे. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची नियोजनबध्द सांगड घालण्यात आली आहे. १२व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. याअनुषंगाने पुर्वतयारीचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला.

यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाच्या व्यक्ती, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यांची बैठक आणि वाहनतळ व्यवस्थेबाबत पाहणी करण्यात आली. सुरक्षेसाठी पोलीस, महानाट्य सुरक्षा व्यवस्था, आपदा मित्र मदत करणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा रस्ता, गेट क्रमांक, आतिशबाजी ठिकाण आदी अनुषंगिक बाबीवर चर्चा करण्यात आली व तयारीबाबतच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी उपस्थितांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here