राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्यासह एकूण २६ खेळाडूंचा गौरव या पुरस्काराने प्रदान करण्यात आला.
बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी व सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना यंदाचा प्रतिष्ठीत खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. तर, नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे व साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी या तिरंदाजांचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात आणखी एका तिरंदाजपटूचा गौरव करण्यात आला ती म्हणजे पॅरा आर्चर शीतल देवी.
महाराष्ट्रातील ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली. तर, यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धेत हात नसतानाही जिने पायाच्या बोटांनी अचून नेम वेधला, त्या शीतल देवीचंही सर्वत्र कौतुक झालं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन शीतल देवीच्या नेमबाजीवर स्तुतीसुमने उधळली होती.
तसेच, तुला हवी ती कार भेट देणार.. अशी घोषणाही त्यांनी केली होती. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शितलने अर्जुन पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपतींनी शीतल देवीला पुरस्कार प्रदान करताना, तो पुरस्कार स्वत:च्या हाती ठेवून तिच्यासमवेत फोटो काढला. त्यावेळी, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची पॅरा तिरंदाज शीतल देवीने देशासाठी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल जेव्हा भारतात परतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचे कौतुक केले. आशियाई स्पर्धेतील विजयानंतर शीतलने यावर्षी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचं ध्येय निश्चित केलं असून ती कसून सराव करत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते
खेलरत्न पुरस्कार
चिराग शेट्टी – बॅडमिंटन
सात्विक साईराज रँकीरेड्डी – बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ओजस प्रवीण देवतळे – धनुर्विद्या
अदिती गोपीचंद स्वामी – धनुर्विद्या
श्रीशंकर – ऍथलेटिक्स
पारुल चौधरी – ऍथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सर
आर वैशाली – बुद्धिबळ
मोहम्मद शमी – क्रिकेट
अनुष अग्रवाल – घोडेस्वारी
दिव्यकृती सिंग – अश्वारूढ पोशाख
दीक्षा डागर – गोल्फ
कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
सुशीला चानू – हॉकी
पवन कुमार – कबड्डी
रितू नेगी – कबड्डी
नसरीन – खो-खो
पिंकी – लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर – शूटिंग
ईशा सिंग – शूटिंग
हरिंदर पाल सिंग – स्क्वॉश
अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
सुनील कुमार – कुस्ती
अंतिम – कुस्ती
रोशिबिना देवी – वुशू
शीतल देवी – पॅरा धनुर्विद्या
अजय कुमार – अंध क्रिकेट
प्राची यादव – पॅरा कॅनोइंग