कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण व अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अवकाळी पावसाने ऊसतोडणी यंत्रणेसह गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत.
आज, बुधवारपासून आकाश कोरडे राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले आहे. रविवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी दिवसभर पुन्हा आकाश गच्च राहिले.
सायंकाळनंतर पावसाची भुरभुर सुरू झाली. रात्री अनेक ठिकाणी जोरदार कोसळला. मंगळवारी पहाटे करवीरसह पन्हाळा, राधानगरी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या ग्रामीण भागात ऊसतोडणी, गुऱ्हाळघरांचा हंगाम सुरू आहे. पावसाने ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय आला आहे. जिथे पाऊस जोरदार झाला आहे, तिथे तोडणी थांबवावी लागली आहे.
शिवारातून वाहनात ऊस भरताना चिखलामुळे पाय निसटतात, त्याचाही परिणाम तोडणी यंत्रणेवर झाला आहे. वीट व्यावसायकांची तारांबळ उडाली असून, विटा झाकून ठेवण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू होती. आजपासून आकाश स्वच्छ राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
वेलवर्गीय पिकांना फटका
ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे वेलवर्गीय पिकांना मोठा फटका बसणार आहे. किडीचा प्रादुर्भाव वाढत असून विशेष काकडी, दोडका, कलिंगडे ही पिके अडचणीत येणार आहेत.
वैरण, शेणी झाकण्यासाठी धावाधाव
वाळलेली वैरण, शेणी झाकण्यासाठी मंगळवारी पहाटे सगळीकडे धावाधाव सुरू असल्याचे दिसले. गुऱ्हाळघरांवर जळण ताडपत्रीने झाकण्यात आल्याचे दिसले.
असे राहील आगामी चार दिवसांत तापमान, डिग्रीमध्ये
बुधवार – १९ ते ३१
गुरुवार – १९ ते ३२
शुक्रवार – १८ ते ३३
शनिवार – १९ ते ३१