यंदा खान बंधूंच्या सिनेमांचा दुष्काळ!, आमिरचा एकमेव सिनेमा; सलमान-शाहरुखच्या सिनेमांचं काय?

0
100

शाहरुख, सलमान आणि आमिर (Shah Rukh Khan, Salman Khan And Aamir Khan) या खान बंधूंचा फार मोठा चाहता वर्ग संपूर्ण जगभर पसरला आहे. यांना कायम आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या चित्रपटाची उत्सुकता असते, पण यंदा खान बंधूंच्या सिनेमांचा दुष्काळ रसिकांना अनुभवावा लागणार असल्याचे चित्र तूर्तास दिसत आहे.

आमिरच्या एकमेव चित्रपटाची अधिकृत माहिती मिळाली आहे, पण सलमान-शाहरुखचे कोणते सिनेमे येणार ते स्पष्ट नाही.

मागच्या वर्षी सलमान खानचे ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर ३’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. याखेरीज मागच्या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘पठाण’मध्ये त्याने साकारलेल्या टायगरने टाळ्या-शिट्ट्या मिळवल्या होत्या.

त्यामुळे या वर्षी सलमानचे कोणते चित्रपट येणार याची उत्सुकता आहे. सलमान सध्या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या ‘द बूल’ या चित्रपटाच्या कामात बिझी आहे.

यात तो १९८८मध्ये मालदिव्जमध्ये केलेल्या ‘ऑपरेशन कॅकटस’चे नेतृत्व करणाऱ्या ब्रिगेडीयर फारूख बलसारांची भूमिका साकारण्यासाठी दररोज साडे तीन मेहनत घेत आहे. विष्णू वर्धन यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा चित्रपट २०२५मध्ये ईदला रिलीज होणार आहे. याखेरीज कबीर खानसाठी सलमान ‘बब्बर शेर’ बनणार असल्याचीही चर्चा आहे. लवकरच या चित्रपटाचीही अधिकृत घोषणा होईल. हा चित्रपटही पुढल्या वर्षीच येईल.

किंग खानने गाजवले मागील वर्ष

‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तीन सुपरहिट सिनेमांसह शाहरुख खानने मागचे वर्ष गाजवले. याखेरीज ‘टायगर ३’मध्ये तो पठाणच्या रूपात दिसला. ‘पठाण’चा १,०५०.३० कोटी, ‘जवान’चा १,१४८.३२ कोटी, ‘डंकी’चा ४२२.९० कोटी रुपये असा मिळून शाहरुखच्या तीन चित्रपटांनी एकूण २६२१.५२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

त्यामुळे यंदा शाहरुखचे कोणते चित्रपट धुमाकूळ घालणार याची उत्सुकता होती, पण यंदा एसआरकेचा एकही चित्रपट रिलीज होणार नसल्याचे चित्र तूर्तास दिसते. मिळालेल्या माहितीनुसार अॅटली शाहरुखसोबत ‘लायन’ आणि ‘जवान २’ची योजना आखत आहे, पण हे चित्रपट यंदा रिलीज होण्याची शक्यता कमी आहे. कमल हासनसोबत शाहरुखच्या ‘हे राम’च्या रिमेकचीही चर्चा आहे. याखेरीज दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरसोबतचा ‘ऑपरेशन खुखरी’, राहुल ढोलकीयांचा अनटायटल सिनेमा, शिमीत अमिनचा आगामी सिनेमा, महेश मथाईंचा ‘सॅल्युट’ या चित्रपटांचीही चर्चा असली तरी ठोस काहीच नाही.

आमिर खान शेवटचा झळकला ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये

११ ऑगस्ट २०२२ रोजी आमिरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ रिलीज झाला होता. त्यानंतर १७ महिने लोटले तरी आमिरच्या पुढील चित्रपटाचा पत्ता नाही. यंदा वर्षा अखेरीस ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘सितारे जमीं पर’ हा ‘तारे जमीं पर’ चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार असल्याचे आमिरने घोषित केले आहे.

ख्रिसमसबाबत बोलायचे तर आजवर आमिरला हा मुहूर्त चांगलाच फळला आहे. ‘पीके’, ‘धूम ३’, ‘तारे जमीं पर’, ‘३ इडियट्स’ आणि ‘गजिनी’ या ख्रिसमसला आलेल्या आमिरच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे आमिर पुन्हा एकदा ख्रिसमसचा मुहूर्त कॅश करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाबाबत तूर्तास जास्त माहिती रिव्हील करण्यात आलेली नाही. याचं दिग्दर्शन आमिर करणार का? ‘तारे जमीं पर’प्रमाणे तो यातही अभिनय करणार का? या प्रश्नांची उत्तरे सध्या कोणाकडे नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here