कोल्हापूर : दर महिन्याच्या पाच तारखेला कमिशन जमा केले जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल या मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रेशन दुकानदारांचा गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला.
त्यामुळे आज गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानातून लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास सुरुवात होईल.
बुधवारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने कमिशनवाढीसह विविध मागण्यांसाठी १ तारखेपासून बेमुदत बंद पुकारला होता, बुधवारी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन धोरण लवकर जाहीर केले जाईल. मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या ५ तारखेला दिली जाईल, कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला असून त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. त्यानंतर महासंघाने संप स्थगित केला.
त्यानंतर कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांनी बंद मागे घेतल्याचे जाहीर करून आज गुरुवारपासून दुकाने सुरू करावेत असे आवाहन केले. यावेळी शहराध्यक्ष राजेश मंडलिक, अशोक सोलापूरे, गजानन हवालदार, दीपक शिराळे, अरुण शिंदे, दीपक चौगुले, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, महादेव कदम, श्रीपतराव पाटील, संदीप पाटील, संजय एसदे, विलास देशपांडे, नींगू पाटील, राजन पाटील आदी उपस्थित होते.