कोल्हापूर : महाज्योती, सारथी व बार्टीच्यावतीने पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. पी.एचडी. फेलोशिपसाठी बुधवारी परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र विभागात या परीक्षेचे केंद्र होते.
यासाठी ४१० नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३७१ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना सी आणि डी या दोन सेटमध्ये सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले.
विशेष म्हणजे प्रश्नसंचामध्ये सील नसलेल्या प्रश्नपत्रिका स्वीकारू नयेत अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडले. त्यांनी ही बाब परीक्षा समन्वयकांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. याआधी झालेल्या परीक्षेत २०१९ ची प्रश्नपत्रिक जशास तशी आल्याने गोंधळ उडाला होता. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आम्हाला सरसकट फेलोशिप द्या अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. यावेळी ‘वाचनकट्टा’चे युवराज कदम, सारथी, महाज्योती, व बार्टी संयुक्त कृती समितीचे प्रा. संभाजी खोत, शिवसेनेचे मंजित माने, कैलाश सातपुते, दयानंद जैनवार, निवास पाटील, वैभव जानकर, कुमाच चौधरी, तयबा मुलानी, राधिका जाधव, रुपाली पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.