मुंबई – राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रेवर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सायंकाळी निकाल दिला. शिवसेनेच्या दोन गटाकडून परस्परांविरोधात दाखल केलेल्य विविध याचिकांवर निर्णय देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षच मूळ शिवसेना असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. तर, दिग्गजांनीही यावर भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला या निकालाचं काहीही देणघेणं नाही, असं म्हटलंय.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तर, विधानसभा अध्यक्षांवरही हल्लाबोल केला होता. तर, मुख्यमंत्री शिंदे यांनीही, आम्ही घराणेशाही मोडीत काढल्याचं म्हटलं. कालच्या निर्णयानंतर अनेकांनी राज्यभर जल्लोष केला. सामान्य शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. दीड वर्षापासून जो विश्वास माझ्यावर ठेवला त्या सर्वांचे आभार, असं एकनाथ शिंदे म्हणाले. या निर्णयासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं. आमचा मिशन मराठा आरक्षण हेच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तो विषय राजकीय आहे, आमचा विषय सामाजिक आहे. आम्हाला त्या विषयाचं काहीही घेणंदेणं नाही. त्यामुळे, निकालाची आम्हाला काहीही धाकधूक नव्हती, असण्याचं काही कारणही नाही. आमची लढाई सामान्य मराठ्यांची आहे. कोणाच्या पुढे काळ, वेळ जाण्याची आम्हाला गरज नाही. शेवटी सरकार म्हणून आम्ही कोणाला का होईना, वेळ दिलेला आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली.
आम्ही आमच्या वेळेवर ठाम आहोत, आमची लढाई आरक्षणासाठीची आहे. ती जिंकणारच, आता ही लढाई थोडीच राहिली आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठीची ही लढाई आहे. बुधवारचा निकाल हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा होता. त्यामुळे, त्यात बोलण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही ताकदीने २० जानेवारीच्या लढाईची तयारी करत आहोत. आम्ही मुंबईला जाणार आहोत, आणि आरक्षणही मिळवणार आहोत, असेही जरांगे यांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेले भाष्य खालच्या पातळींवरील आहे. स्वतःच मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही. उद्धव ठाकरे काल पत्रकारांवर उबाठा म्हटलं म्हणून संतापले. मात्र त्यांनी बाळासाहेबांच्याऐवजी स्वत:चे नाव पक्षासाठी मागितले. त्यामुळे त्यांना नेमकं काय पाहिजे हे समजले, असा निशाणा एकनाथ शिंदेंनी साधला. घराणेशाहीला ही चपराक आहे. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा घटनेच्या आधारावर सर्व चालत होतं. नंतर मनमानी कारभार सुरु झाला, असा आरोपही एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. उद्धव ठाकरे उद्या कल्याण दौरा करणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचवावे, असं आव्हान देखील एकनाथ शिंदेंनी दिले.