कोल्हापूर : प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर विमानतळाचे (Kolhapur Airport) काम पूर्णत्वास जात आहे. विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde on Kolhapur Airport) यांनी दिली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळ इमारतीच्या कामांची पाहणी केली. विमानतळावर धावपट्टी 1780 मीटरची केली आहे. दुसऱ्या टप्प्यात 2300 मीटरची करू, असेही शिंदे म्हणाले. थोडेच काम बाकी आहे. येत्या काही दिवसात तारिख निश्चित झाल्यानंतर भव्य लोकार्पण करू असे ते यावेळी म्हणाले.
कोल्हापूरचा इतिहास विमानतळावर दिसणार
शिंदे यांनी इमारतीची पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देश दिले. तसेच आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी शिंदे यांनी स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र व इतर कलाकृतींचे कौतुक केले.
5 लाख प्रवाशांना वार्षिक सेवा देण्याची क्षमता
यावेळी त्यांनी आरक्षण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, प्रवाशांसाठी असणारा आराम कक्ष, आरक्षित असणारा व्हिआयपी कक्ष तसेच इतर सुविधांची पाहणी केली. कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळेल असे ते म्हणाले. मुंबई, बंगलोर व हैद्राबाद या प्रमुख तीन शहरांना अखंड स्वरूपात कोल्हापूर जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 5 लाख प्रवाशांना वार्षिक सेवा देण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे.
दीड वर्षापूर्वी आम्ही नियोजन करताना फक्त काचेची इमारत करायची नाही असे नियोजन केले. यात मराठ्यांचा इतिहास आणि संस्कृती, मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू निर्माण करून विमानतळ उभारण्याची कल्पना होती. अशाच प्रकारे दगडी बांधकामात, मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्यांप्रमाणे आज विमानतळ आपणाला पाहायला मिळत आहे याचा निश्चितच स्थानिकांना आनंद मिळेल असे ते यावेळी म्हणाले.