कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

0
87

कोल्हापूर: प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट करत असतात. कधी देशातील गंभीर समस्या तर कधी एखादा चांगला व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक करत असतात.

इतकेच काय पण एखाद्याचा बालहट्टही पुरवतात आणि आर्थिक मदतही पुरवतात. आताही त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी कोल्हापूरच्याविमानतळाच्या नव्या इमारतीला ऐतिहासिक आणि आर्किटेक्चरल लूक दिल्याबद्दल इमारतीचे दोन फोटोंसह कौतुक केले आहे.

कोल्हापूरचे विमानतळ म्हणजे, स्टील, काच आणि सिमेंटवर आधारित फक्त केवळ सांगाडा नाही तर स्थानिक इतिहास आणि स्थापत्यकलेवर आधारित अनोखी ओळख देण्याचे काम केले आहे. या सरकारच्या दृष्टीचा मी आदर करतो, असे कौतुक आनंद महिंद्रा यांनी केले आहे. इंडियन टेक्नॉलॉजी ॲन्ड इन्फ्राच्या सोशल मीडियावरील कोल्हापूरच्या विमानतळाच्या लूकवरील पोस्टवर त्यांनी हे रिट्विट केले आहे.

कोल्हापूरच्या विमानतळाच्या इमारतीची पाहणी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच केली. या इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात लावले आहेत.

पर्यटकांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन, स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र आणि इतर कलाकृतींचा समावेश आहे. याशिवाय मराठ्यांचा इतिहास आणि संस्कृती, मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू दगडी बांधकामात, मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्यांप्रमाणे हे विमानतळ सजलेले आहे. यासंदर्भातील फोटो एक्स अकाउंटवरून पोस्ट केल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here