गडहिंग्लज : डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

0
127

गडहिंग्लज : डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या शाळकरी मुलीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय १७, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव येथील प्रकाश गोरुले हे सरंबळवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी श्रावणी हीदेखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. २०१९ पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते. १ जानेवारीला सीटीस्कॅन व एमआरआय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झालेली नव्हती.

मानसोपचारतज्ज्ञाकडूनही उपचार केले; परंतु त्यांच्या औषधोपचारानेही काही फरक न पडल्यामुळे चार दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यातून उपचार सुरू होते. डोकेदुखीच्या त्रासामुळे ती निराश व अबोल असायची.

दरम्यान, सोमवारी सकाळी वडील शाळेला आणि आई भांडी धुण्याकरिता घराच्या पाठीमागे गेली असताना तिने साडेअकराच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. वडील प्रकाश गोरुले यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here