कोल्हापूर : इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी मला वारंवार विचारणा केली जात आहे. मी याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. पहिल्यांदा आपली ताकद दाखवू. त्यानंतर त्यांनाच निर्णय घेण्यास भाग पाडूया, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित प्रागतिक पक्ष व संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, यापूर्वीचा आमचा अनुभव चांगला नाही. सत्तेत आल्यानंतर आम्हाला न विचारता अनेक निर्णय घेतले जातात. महत्त्वाचा कायदा करण्यासंदर्भात आम्हाला विचारले जात नाही.
पवार-पाटील यांनी माझ्या शारीरिक अडचणीमुळे मी फक्त नावापुरते काम करू शकतो. त्यामुळे माझ्याऐवजी मंचचे दुसऱ्याला निमंत्रक म्हणून नेमण्यात यावे, असे सांगितले. याला सर्व कार्यकर्त्यांनी विरोध दाखवला. यामुळे पवार-पाटील हेच कोल्हापूर विभागाचे निमंत्रक असल्याचा ठराव करण्यात आला.
यावेळी उदय नारकर यांनी प्रास्ताविक केले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते प्रताप होगाडे यांनी प्रागतिक मंच आघाडीची भूमिका स्पष्ट केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ए. बी. पाटील, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष सावंत यांची भाषणे झाली. बैठकीस बाबुराव कदम, रघुनाथ कांबळे, रामचंद्र कांबळे, सुरेश दगडे, वसंतराव पाटील, रवी जाधव, वैभव कांबळे, केरबा पाटील, डी. के. कांबळे यांच्यासह प्रागतिक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.