कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 17 व 18 जानेवारीला सुरू होणार कॅम्प…!

0
166

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रशासनाच्यावतीने १७ व १८ जानेवारी रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत जात प्रमाणपत्र अर्ज उपलब्ध करुन देणे व आवश्यक कागदपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करतील,असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु करावी. कुणबी असल्याबाबतच्या नोंदी सर्व सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी नोंदीची यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात यावे.

आढळून आलेल्या सर्व नोंदी जिल्हा संकेतस्थळावरही अपलोड करण्यात यावे. कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या असून यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र देखील पाठवण्यात आले आहेत.


विविध कार्यालयात १९६७ पूर्वीच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीअंती आढळून आलेल्या नोंदीचा अहवाल वेळोवेळी सादर केला जात आहे. नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी,आढळून आलेल्या नोंदीची यादी तलाठी व ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तर, ग्रामपंचायत कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्याची व भरुन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण भरलेला अर्ज जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा सामाईक सुविधा केंद्रात दाखल करण्यासाठी अर्जदारांना मदत करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रथम त्यांचेशी संबंधित नोंदी शोधण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले पूर्वजांचे नावांचा शोध घ्यावा. संबंधित नोंदी सापडल्यानंतर संबंधित कार्यालयातून नोंदीची प्रमाणित प्रत मिळवावी. उदा. मोडी भाषेतील नमुना ३३ व ३४ साठी संबंधित तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, प्रवेश निर्गम उतारा संबंधीत शाळेतून तर खासरा पत्रक, क पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही इत्यादी अभिलेखांतील आवश्यक नोंदीच्या प्रमाणित प्रती संबंधित तहसिल कार्यालयातून विहित शुल्क भरणा करुन प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here